वारकऱ्यांना अडचण होणार नाही; अन्यथा कारवाई : आ. विलास भुमरे

Foto
पैठण, (प्रतिनिधी)  :  येथे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या नाथषष्ठी उत्सवाचा मुख्य सोहळा ९ मार्चपासून सुरू होत असून यंदा पाच ते सात लाख वारकरी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होता कामा नये, सुविधा अपुऱ्या आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार विलास भुमरे यांनी दिला. नाथ मंदिरात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपविभागीय अधिकारी निलम बाफना, संभाजी आडकुणे, तहसीलदार ज्योती न पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, नगराध्यक्ष विद्या कावसाणकर, राजेंद्र बोरकर, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, व्यापारी महासंघाचे पवन लोहिया, भुषण कावसाणकर, नगरसेवक बजरंग लिंबोरे, जितुभाऊ परदेशी, शेखर शिंदे आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रत्येक विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महावितरण, आरोग्य विभाग, एसटी महामंडळ तसेच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत अनुपस्थित असल्याने त्यांच्या जागी उपस्थित सहाय्यक अभियंता निंबाळकर यांना संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असेही आदेश आमदार भुमरे यांनी दिले.

उत्सव काळात विजेची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, मनुष्यबळ वाढवावे तसेच आरोग्य विभागाने वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. पंडित किल्लारीकर यांनी आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले.

बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यालगतची काटेरी झाडेझुडपे तोडून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर यांनी दिली. यावेळी डॉ. पंडित किल्लारीकर, नंदू अण्णा काळे, दादा बारे, तुषार पाटील, गजानन मडके, राजेश कांबळे, शहादेव लोहारे, जालिंदर आडसुळ, गौरव आठवले, वीर करकोटक गायकवाड, विजय सुते यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.